किनवट | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चापलानाईक तांडा येथे ‘आनंदनगरी’ हा शैक्षणिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, स्वावलंबन आणि आत्मविश्वास विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग यांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरा बु. येथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि त्यांचे विद्यार्थीही विशेष उपस्थित होते.
‘आनंदनगरी’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे रुचकर खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. प्रत्येक गटाने स्वतंत्र स्टॉल उभारून आपल्या पदार्थांची विक्री केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैशांची देवाण-घेवाण, किंमत ठरविणे, नफा-तोटा समजून घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः प्रत्यक्ष व्यवहार हाताळून व्यवहारज्ञानाचा अनुभव घेतला. कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात आनंदी व उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले होते. पालकांनीही विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांचे कौतुक केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ‘करून शिकणे’ या शिक्षणपद्धतीचा प्रभावी अनुभव मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षकांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षणप्रेमी नागरिक ,सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश कोतपेल्लीवार सर आणि सहशिक्षक श्री संदीप भुरके सर यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्य, नियोजन आणि योगदानामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
