सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, किनवट यांच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे बुलंद व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान होय. मोठ्या उत्साहात आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या विशेष प्रसंगी तालुक्यातील उभरती व अत्यंत गुणी कलाकार साक्षी वाडगुरे हिला तिच्या उत्कृष्ट कलाकारीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साक्षी वाडगुरे ही एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून ती उत्कृष्ट रांगोळीकार, चित्रकार तसेच समर्पित कलाशिक्षिका म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये तिने आपल्या कलाकृतींद्वारे ठसा उमटवला आहे.
शिवजन्मोत्सव २०२६ निमित्त साकारलेल्या तिच्या आकर्षक आणि प्रभावी रांगोळी कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या कलेतून शिवभक्ती, इतिहासाची जाणीव आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. याबद्दल तिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते साक्षीचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला नगराध्यक्ष सौ. सुजाताताई येन्द्रलवार, श्रीमती बेबीताई नाईक तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सन्मान स्वीकारताना साक्षी वाडगुरे हिने सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच आपल्या यशामागे गुरूजन, कुटुंबीय व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ असल्याचे तिने नमूद केले. तिच्या मते हा सन्मान केवळ तिचा नसून तिच्या कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे.
किनवट तालुक्यातील कला क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण असून साक्षी वाडगुरे सारख्या उभरत्या कलाकारांमुळे तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल होत आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे उत्कृष्ट कलाकृती साकारत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
“या सन्मानाची मानकरी म्हणून माझी निवड झाली, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. मात्र हा सन्मान केवळ माझा नसून, वेळोवेळी मला योग्य मार्गदर्शन करणारे आणि प्रत्येक टप्प्यावर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे गुरुवर्य श्री. प्रमोद आर्वी सर, तसेच माझे आई-वडील यांचाच आहे. त्यांच्या संस्कारांमुळे आणि प्रेरणेमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले.
तसेच मला ही संधी उपलब्ध करून देणारे मा. शिंदे सर आणि बाळकृष्ण कदम सर यांचेही मी मनःपूर्वक आभार मानते. त्यांच्या विश्वासामुळे आणि प्रोत्साहनामुळे माझ्या कलेला योग्य व्यासपीठ मिळाले.
माझ्या कलेवर प्रेम करणाऱ्या, सतत साथ देणाऱ्या सर्व शुभेच्छुकांचे मी ऋणी आहे. भविष्यातही अधिक मेहनत घेऊन, अधिक उत्कृष्ट कलाकृती साकारत राहण्याचा मी प्रयत्न करेन.” - साक्षी वाडगुरे ( किनवट )

अभिनंदन साक्षी ताई 💐💐💐
उत्तर द्याहटवासाक्षीजी , आपणास लोकपत्रकार टीमकडुनही खुप खुप शुभेच्छा 😊💐🔥
उत्तर द्याहटवा